बुधवार, ९ जुलै, २०१४

Thank You

एकदा वाटतं मागचं वर्ष आपल्या आयुष्यातून काढून टाकलं तर.... पण ते काय शक्य आहे? आणि तसं झालं तर माझ्या आयुष्यातून मोलाचे मित्र- मैत्रिणी ही वजा करण्यासारखे होईल
   माझे पती कमांडर शिशिर दीक्षित हे भारतीय नौसेनेमध्ये आहेत. त्यामुळे सतत बदली आणि वेगवेगळी लोकं आयुष्यात आली. कधी त्यामुळे जवळीक तर कधी दुरावा झाला.
     10 सप्टेंबर रोजी हे ताप आल्यामुळे आमच्या नौसेनेच्या दवाखान्यात दाखल झाले. लवकरच कळले की त्यांना कावीळ झाली आहे. ताबडतोब त्यांच्यावर उपचार सुरू झाले. आमच्याकडे मी आणि माझा मुलगा एवढेच असतो. आमच्या मित्र- मैत्रिणिंनी लगेचच मदतीचा हात पुढे केला. माझा मुलगा आठ वर्षाचा होता आणि मी एका शाळेची मुख्याध्यापिका होते. त्यामुळे ही सगळी धांदल संभाळणे अवघड होते. पण मनात सतत सकारात्मक विचारच आणून स्वतःला दिलासा देत होते.
     त्यांचा कावीळचा आकडा वाढतच चालला होता. अचानक कळले की त्यांना अजून उपचारासाठी मुंबईला हलविण्यात येणार होते. लोणावल्याला होते तेंव्हा दवाखान्यात जाणे- येणे सहज शक्य होते. पण मुंबईला त्यांना नेणार म्हटल्यावर जरा वाईट वाटले. कारण तिथे त्यांना किती दिवस ठेवणार आणि मी सतत कशी जाऊ शकणार असे सर्व प्रश्न मनात घर करू लागले होते.
      पण या सर्वांमधून मी बाहेर पडले ते केवळ आमच्या मित्र-मैत्रिणिं मुळे. मी दर शनिवार-रविवार मुंबईला जात होते. माझं बुकिंग झाल्यावर माझ्या हातात तिकीट यायचं. कारण खूप विचार करण्याची माझी क्षमता बहुदा गायब झाली होती. मी कधी माझ्या मुलाला (आरुष)  बरोबर घेऊन निघायचे किंवा कधी तिथेच लोणावल्याला कोणाच्या घरी ठेवायचे. कारण त्याचा अभ्यास- परिक्षा याकडेही दुर्लक्ष करायची इच्छा नव्हती. लोणावळ्यात त्याचं खाणं-पिणं, अभ्यास, त्याला कशात गुंतवून ठेवणं या सगळ्याची जवाबदारी व काळजी माझ्या अनेक मैत्रिणींनी घेतली.
     तर मुंबईत मला कधी राहायला जागा नाही मिळाली, तर मी मैत्रिणिंकडे राहायला जायचे. तिथून हॉस्पिटल काही अंतरावर होते. पण मग त्या दिलखुलासपणे त्यांची गाडी वापरायला देत होत्या. त्यानी सर्वांनी मला बजावले होते की इतर कुठे रूम पाहण्यापेक्षा बिनधास्त आमच्याकडे राहायला ये. सुरुवातीला संकोच वाटायचा, पण या शिवाय पर्याय देखील नव्हता. त्यांनी सर्वांनी मला खूप दिलासा दिला, त्यामुळे माझ्या मनात सतत सकारात्मक विचार येत असत.
     24 तास हॉस्पिटलमध्ये बसणं शक्य नव्हते. मग त्या मला बाहेर फिरायला घेऊन जात. शिवाय शिशिर देखील हॉस्पिटलमधील खाणं खाऊन कंटाळाला होता. तेव्हा मैत्रिणींनी मी नसतानाही काविळमध्ये काय खायला देता येईल, हे विचारून डबे पाठवायला सुरू केले. ह्यांचे मित्रही हॉस्पिटलमध्ये जाऊन बसायचे. कधी ह्यांना थोड्यावेळसाठी बाहेर सोडले, तर त्यांना फिरवून आणायचे. त्यांना कोणी एकटं सोडलं नाही. ह्यांना भेटून मी लोणावळ्यात गेले की, मला ही कोणी एकटं सोडलं नाही. घरातल्या परिस्थितीचा आरुषवर परिणाम होऊ दिला नाही. या काळात घरातले सणवार आणि पूजापाठ देखील व्यवस्थित पार पाडण्यात त्यांनी मला सहकार्य केले.
     ह्यांचा बिलिरुबिन चा आकडा कमी झाल्याची बातमी ऐकताच माझ्याबरोबर इतर सर्वांनाही तेवढाच आनंद व्हायचा. हे सहा महिन्यांनी घरी आल्यावर आम्ही आनंदी होतोच, पण आमच्या आनंदात आमचे मित्रमंडळीही तेवढेच आनंदी होते, हे दिसत होते. हे घरी आल्यावर घरी फुलांचे गुच्छ आले होते.
त्या सर्वांमुळेच हे दिव्य पार पडले, असं आम्हाला मनापासून वाटतं. त्या सर्वांची मी खरोखर अतिशय मनापासून आभारी आणि ऋणी आहे.