सोमवार, ९ फेब्रुवारी, २०१५

यांना आपलेसे करून पहा

           माझं लग्न नौसेनेमधील अधिकारी शिशिर दीक्षित यांच्याशी झाले. हे नौसेनेतील वैवाहिक जीवन मला समजून घ्यायचे होते. त्यामुळे सुरुवातीला आपण नोकरी करायची नाही असे मी ठरवले होते. पण घरी नुसते बसणे मला अवघड होते. त्याच काळात आमच्या नौसेनेची मतिमंद मुलांची शाळा आहे. त्याची जाहिरात आली की त्यांना एका सहाय्यक शिक्षकाची गरज आहे. त्यावेळी आम्ही विशाखापट्टनंला राहत होतो. मे लगेच त्यांना फोन केला. माझी याठिकाणी विनामूल्य काम करायची तयारी दाखवली. त्यांनी सांगितले की मी आधी ते शाळा पाहावी, तिथले वातावरण पहावे. आणि जर मला ठीक वाटले तरच मी तिथे काम करावे.
          त्याप्रमाणे मी त्या शाळेत गेले. पहिल्या दिवशी साहजिकच सर्व काही नवीन असल्याने माहीत नव्हते, नेमके काय करायचे. पण त्या दिवशी एवढे मात्र नक्की ठरविले की आपण इथे काम करायचे. या मुलांसाठी काही तरी नक्की करायचे. मी रोज जायला लागले. खरोखर अशा मुलांना शिकवणे, संभाळने सोप्पी गोष्ट नाही. आपल्या देखील मनावर ताबा आणि खूप संयम ठेवावा लागतो. त्यांना एकाच गोष्ट अनेकदा शिकवावी लागते. तेव्हा ती त्यांच्या लक्षात राहते. त्यात काही मुलांची आकलन क्षमता थोडी ठीक असते, पण काही मुलांना साधी गोष्ट समजून सांगतांना खूप वेळ देखील लागतो. पण आपला संयम न जाउ देता त्याना दरवेळी तितक्याच उत्साहाने त्याच त्याच गोष्टी समजावून सांगायच्या असतात. इतर मुलानपेक्षा ते काही वेगळे नाहीत, असा विश्वास त्यांच्यात निर्माण करायचा असतो.
          त्यांच्याकडून विविध उपक्रम करवून त्यांच्यामधील आत्मविश्वास वाढवण्याचे काम करायचे असते. हे सर्व सोप्पे नव्हते. पण अशक्य देखील नव्हते. थोडे अवघड होते एवढेच. मी रोज तिथे जायला लागले. त्या सर्वांमध्ये स्वतःला गुंतवून घेत होते. त्या मुलांना समजून घ्यायचा प्रयत्न करत होते. त्यामधून काही मुलांमध्ये थोडी जरी सकारात्मक प्रगती दिसून आली की खरोखर मानसिक समाधान वाटायचे. आपल्या हातून नक्कीच खूप चांगले कार्य होत आहे असा एक विश्वास निर्माण व्हायचा. नवीन गाणी, नवीन उपक्रम त्यावेळी ते स्वतः सहभागी होऊन करायला लागल्यावर कित्येकदा डोळे भरून यायचे. खरोखर खूपच वेगळे जग होते हे. असे कार्य मे जवळ जवळ दोन वर्ष केले. पण पुढे बदली झाल्याने मी हे पुढे चालू ठेऊ शकले नाही.
          पण एवढे मात्र नक्की वाटते, आपण या समाजातील एक भाग आहोत. त्यामुळे कोणत्या न कोणत्या स्वरुपात आपणही या समाजासाठी काही तरी करावे, असे मात्र खरोखर मनापासून वाटते. आपला थोडा वेळ नक्कीच अशाप्रकारच्या चांगल्या कामासाठी द्यावा.
सौ. अर्चना दीक्षित