सोमवार, २४ जुलै, २०१७

चॉकलेट आइस क्रीम इन अ चॉकलेट बलून

चॉकलेट आइस क्रीम इन अ चॉकलेट बलून

साहित्य:- एक डार्क चॉकलेट ब्रिक, काही चांगल्या क्वालिटीचे फुगे, डेकोरेशन करण्याचे साहित्य, चॉकलेट आइस क्रीम


कृती:- प्रथम चॉकलेट वितळून घेणे. फुगे देखील फूगवून घेणे. एक-एक करून फुगे त्या चॉकलेट मधे घोळावून घेणे. याचा जाड थर बनण्यासाठी २-३ वेळा हे फुगे चॉकलेट मधे घोळावून घेणे. ते फ्रीज मधे ठेवून सेट करावे. पुन्हा एकदा चॉकलेट मधे घोळावून त्यावर डेकोरेशन पसरविणे. आणि परत सेट करण्यासाठी फ्रीज मधे ठेवावे. साधारण अर्धातासाने  बाहेर काढून हळूच फुगे पिनेने फोडून अलगद हाताने काढून घ्यावे. आणि परत फ्रीज मधे ठेवावे. ज्यावेळी आपल्याला सर्व्ह करायचे असेल तेव्हा हे बाहेर काढून त्यात चॉकलेट आइस क्रीम घालून लगेच सर्व्ह करावे.


सौ अर्चना दीक्षित

सोमवार, १७ जुलै, २०१७

पास्ता पनिशमेंट

पास्ता पनिशमेंट


 साहित्य:- पेन्ने पास्ता, ३-४ कांदे, २ टोमॅटो, सिमला मिरची, गाजर, कॉर्न चे दाणे, मिक्स हर्ब्स, चीज, मीठ, ओलिव्ह ओईल

कृती:- प्रथम पास्ता पाण्यात थोडे मीठ टाकून उकळून घेणे. त्यानंतर एका कढई मधे ओलिव्ह ओईल घेणे. त्यात बारीक चिरलेले कांदे छान   लाल सर परतून घेणे. मग टोमॅटो घालून एकजीव करणे. मग यात बारीक चिरलेले गाजाराचे काप घालून छान परतून घेणे. यानंतर सिमला मिरची आणि कॉर्न चे दाणे घालून मिश्रण ढवळून घेणे. चवीनुसार मीठ घालून आणि मिक्स हर्ब्स घालून हे मिश्रण तयार करणे.
          एका केक पत्रात हे पेन्ने पास्ता उभे करून ठेवावे. वरुन हळूवार सर्व मिश्रण ओतावे. ते छान पास्ता मधे भरले जाईल असे करावे. या वरुन किसलेले चीज पसरावावे. आणि ओव्हन मधे १५०डिग्री वर साधारण १० मिनिटे म्हणजे चीज मेल्ट होईपर्यंत ठेवावे. आणि मग बाहेर काढून गरम गरम सर्व्ह करावे.

सौ अर्चना दीक्षित

रविवार, २ जुलै, २०१७

माझा छंद

माझा छंद

          खूप लहान पणापासून मला काही तरी लिहायची आवड होती. मग मी अचानक कविता करायला लागले. कदाचित मला त्यावेळी उमगले की कविता करू शकते म्हणून. विविध विषयावर कविता करायची मला आवड लागली. पुढे कॉलेज ला गेले तेव्हा माझे मित्र - मैत्रिणी पण कविता करणारे होते. मग काय कट्यावर एखादा विषय मिळायचा अवकाश आम्ही लगेच कविता करायचो. कधी त्या कागदावर लिहित्या जायच्या किंवा कधी फक्त कट्यावरच राहायच्या. पण मग मी ठरवले आपण याचे छान जतन केले तर. अस म्हणून मी एक छानशी वही बनवून त्यात लिहीत गेले. विषय मिळत गेले आणि कविता बनत गेल्या. अशा मी बर्‍याच कविता बनविल्या.  त्याचे कट्यावर, घरी, लोकांपुढे वाचन केले. त्यांच्या कडून वा- वा ची दाद मिळविली. कोणी काही सुधारणा असतील तर त्या समजून सांगितल्या. मी सुधारत गेले.
          मग अचानक एकदा आमचे एक जवळचे कवी काका, मनोहर शुक्ल, म्हणाले,'अग तू इतक्या छान कविता करतेस, त्याचा एक छान संच किंवा पुस्तक का नाही बनवत.' मी म्हटल काय करायचा पुस्तक आणि कोण घेणार ते. माझ्या कविता वहितच ठीक आहेत. पण त्यांनी मला अजुन अजुन प्रोत्साहन दिले आणि मला एक पुस्तक प्रकाशित करायला सांगितले. त्याच वेळी माझे लग्न ठरले होते. मग काय अजुन उत्साह आला. आणि मी माझ्या माहेरच्या नावाने हे पुस्तक प्रकाशित करायचे ठरवले. अशा प्रकारे माझा पहिला कविता संग्रह 'संगमी' नावाने प्रसिद्ध केला.
          त्यातल्या एका कवितेच्या काही ओळी...
                               'अशी कविता
                          फुलाप्रमाणे हळूवार उमलते
                          काट्याप्रमाणे चटकन रुतते
                          रण-.रणत्या उन्हात चांदणं भासवते.
                               अशी कविता
                          शरदाच्या चांदण्यात भिजवून टाकते
                          ग्रिश्मात पिसारा फुलवून जाते
                          आभाळप्रमाणे शब्दांनी भरून येते
                                अशी कविता
                          प्रेमिकांचे प्रेम जपते
                          भाविकांचे भाव जपते
                          शृंगाराने स्वत:च लपते
                                  अशी कविता....'

सौ अर्चना दीक्षित