"आपके त्वचासे आपके उमर का पता ही नहीं चालता है|"
झालं हे एक वाक्य ऐकण्यासाठी अहो बायका काय पुरुष देखील तितकेच उत्सुक असतात बरं का.
आजकाल फॅशन प्रमाणे राहाणे सगळ्यांना आवडते. आणि मी म्हणते का नाही रहायचं. जरुर आपण या प्रमाणे रहायलाच हवं. जसं जग बदलत आहे तसं स्वतः मध्ये बदल घडवायला हवे.
मग हे सौंदर्य जपण्यासाठी विविध उपाय करण्याचे मार्ग सुद्धा उपलब्ध आहेत.
'अग भावना ऐक ना मी काय म्हणतो मी ना आत्ता ऑनलाईन शॉपिंग वर काही गृह उपयोगी वस्तू मागवत आहे. तर बघ ना मला ना एक भारी फेस क्रीम आणि फेस लोशन दिसले आहे. खास पुरुषांसाठी. एवढ्यात जरा स्किन उन्हामुळे काळवंडलेली दिसते. काय म्हणते मागवून टाकु का. मागच्या आठवड्यात परश्याने पण बोलता बोलता म्हटले होते या प्रोडक्ट विषयी. आणि पहा ना आज सहज ऑनलाईन शॉपिंग करताना मला हे दिसले. जरा मागवून बघतो.'
'हो हो मागवाच बाई. एवढ्यात खरच तुम्ही काळवंडल्यासारखे वाटता हं. वापरून बघा. नाही आवडली तर देऊन टाका कोणाला.' अशी चर्चा काही ठिकाणी सुरू असते.
तर कुठे नवरा घरी आल्यावर क्षणाचा विलंब न करता बायको विचारते, 'अहो काय मग आज मी कशी दिसते आहे?'
नवऱ्या पुढे मोठ्ठा प्रश्नच उभा राहतो. तो थोडा वेळ विचार करून म्हणतो, 'अरे वाह भारीच की. परिस्थित चाचपडत आज पार्लर मध्ये गेली होतीस वाटतं. मस्त ग मस्तच.' त्यावर बायको खुष होत म्हणते, 'अय्या, कसलं ओळखता हो तुम्ही. मान गए आपको. पण खरं सांगू का, मी ना पार्लर मध्ये नव्हते गेले. अहो त्या रेवाची आई आहे ना, तर त्या ना घरगुती सौंदर्य प्रसाधने तयार करून विकतात. आणि किंमत देखील आवाक्यातील आहे हो. म्हणून म्हटले घेऊन जरा वापरून बघावं. मला पण छान वाटत आहे हे.'
तर काही घरांमध्ये तर ब्रॅंडला महत्व दिले जाते. 'ज्याचं नाव त्यालाच भाव', असं मानतात. हो मी कुठे काही हरकत घेत आहे. बिलकुल चालेल कोणतेही सौंदर्य प्रसाधन. काय हवं ते वापरा. आता याचा अर्थ चुकीचा नका घेऊ. वाट्टेल ते वापरा, असा अर्थ नका हं घेऊ.
कारण काय असतं, प्रत्येक व्यक्तीच्या त्वचेचा रंग, त्वचेची रचना, ऋतू नुसार होणारे त्वचेतील बदल, काही कारणांमुळे हवामानामुळे त्वचेवर होणारा परिणाम या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन मगच आपल्याला सौंदर्य प्रसाधने निवडावी लागतात. बरेच वेळा काहींची त्वचा संवेदनशील असते. कोणतेही क्रीम त्यांना लाऊन चालत नाही. योग्य मार्गदर्शन घेऊन, तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रसाधन वापरणे योग्य आहे.
नाही तर टिव्ही वर जाहिरात बघुन लगेच तेच छान आहे. 'मग बघा ना करीना कपूर तेच वापरते. मी पण हेच विकत घेणार.' असं किंवा शाहरूख खान जे चेहऱ्यावर क्रीम लावतो, ते जगात भारी. आपण पण तेच लावणार ना भो. असं म्हणणं अयोग्य आहे हो.
एवढेच काय पण आपण सौंदर्य प्रसाधनाच्या दुकनात जातो आणि त्यांनाच विचारतो, 'सध्या कोणते प्रोडक्ट जास्त छान हो भाऊ? मला तर बाई शुगर, नायका, मेबीलिन अशी नावे माहीत आहेत. ' दुकानदार काय त्याला विकायचेच आहे त्याच्या दुकानातील वस्तू. तो अजून अजून महाग प्रोडक्ट दाखवत आणि त्याविषयी अगदी पटवून सांगत, आपला माल विकत असतो.
तर काही लोकं ऑनलाईन शॉपिंग स्वस्त पडते म्हणून त्यांच्या नादाला लागतात. 'कुठे त्या दुकानात जा, गाडीचे पेट्रोल खर्च करा, त्यापेक्षा हे ऑनलाईन शॉपिंग बरं बाई किंवा बरं बुआ. मस्त घर बसल्या हातात येते. आणि शिवाय स्वस्त पडतं. कोणते का प्रोडक्ट असेना. आपल्याला काय चेहऱ्यावर, हाताला काही तरी क्रीम फासले म्हणजे झाले. इथे कोणाला एवढा फालतुचा वेळ आहे राव.'
इथेच आपण जरासे चुकतो हो. मग त्याचा दुष्परिणाम आपल्यालाच भोगावा लागतो. म्हणून तर स्वतःची काळजी स्वतःला नीट जाणून घेऊन, योग्य मार्गदर्शन घेऊन करा.
काय मग स्वतः साठी वेळ काढायला तयार ना?
सौ अर्चना शिशिर दीक्षित
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा