गुरुवार, १७ ऑगस्ट, २०२३

मी सौंदर्यवती (१४ समाजकार्य)

 'वसुधैव कुटुम्बकम्'

अहो आता काय सांगणार आजकाल समाजकार्य ही पण एक फॅशनच व्हायला लागली आहे. कितीतरी लोक असतात ती खरोखर मन लावून समाजकार्य करत असतात.  म्हणजे अक्षरशः स्वतःला वाहून घेतात या समाजकार्यासाठी. आणि मी म्हणते त्यात चुकीचं नाही ना,  बरोबरच आहे.  आपण जर या समाजाचे काही घटक आहोत. तर या समाजाला आपल्याकडून काहीतरी परत दिलं गेलं तर त्यात एक वेगळच समाधान असतं. आणि यातूनच सामाजिक बांधिलकी याची देखील भावना निर्माण होते. आणि या सामाजिक बांधिलकीची जाणीव एका दोघाला असून उपयोगी नाही, तर सगळ्यांना किंवा अनेकांना याची जाणीव असली पाहिजे. मग तो तुमच्या आजूबाजूचा समाज असो किंवा इतर कुठेही असो. आणि या समाज म्हणजे एखादी जात धर्म असं न बघता माणसाने माणसासाठी केलेली मदत किंवा सहकार्य म्हणजे समाजकार्य असे मला वाटतं हं. यातूनच आपल्यातील जी माणुसकी असते तीही जागृत राहते. आपल्यामुळे एखाद्या व्यक्तीचे किंवा एखाद्या कुटुंबाचे एवढेच काय एखाद्या समाजाचे जर चांगले होत असेल आणि त्यातनं जे मिळणार समाधान असते ते खरोखरच छान नाही का? अहो इतकच काय पण आपण जे कार्य करत असतो,  काम करत असतो ते आपल्या घरातली प्रत्येक व्यक्ती बघत असते आणि त्यापासून ते प्रोत्साहन / प्रेरणा पण घेत असतात. 

बऱ्याचदा आपण कित्येक घरांमध्ये बघतो की अख्या जगाच्या  हे समाजकार्याचा जणू विडा उचलत असतात. अख्या घरात म्हणजे घरातले आजी, आजोबा, आई, वडील, मुलं हे देखील त्या समाजकार्यासाठी झटत असतात. हे किती प्रेरणादायी आहे, असं मला वाटतं. अशा घरातील वातावरण पण बघा नेहमी समाधानी, आनंदी असंच आपल्याला दिसून येतं. अशा घरातील व्यक्तींच्या समाजाकडून खूप काही अपेक्षा नसतात. पण आपण समाजासाठी काहीतरी करत राहणार, ही मात्र त्यांची नेहमीच तळमळ असते. वसुधैव कुटुम्बकम अशीच भावना त्यांच्या मनात असते. अहो हे खरंच वाखाणण्यासारखीच गोष्ट आहे. जगातल्या सगळ्यांनाच नाही जमत बर का हे. आणि जमलंच पाहिजे असाही माझा आग्रह नाही. केवळ सामाजिक बांधिलकीची भावना असावी एवढेच माझं मत आहे. 

आणि हे सगळं करताना मला समाजाकडून काय मिळेल याची अपेक्षा करणं चुकीचं असं माझं मत आहे. नाहीतर कधी कधी काहींच्या मनात असे येतं, 'मी त्याला मदत केली पण त्यांनी माझ्यासाठी काय केलं. काहीच नाही ना. मग मी कशाला विचार करू, द्या सोडून, मी नाही करणार यापुढे कोणाची मदत. त्या व्यक्तीचा किंवा त्या समाजाचा मला काय उपयोग. मला काय घेणं समाजाचं.  मी नाही समाजकार्य वगैरे करत बसणार. माझं माझं काही कमी आहे, की मी त्या समाजाचा घेऊन बसू. कोणी सांगितलं नसती उठा ठेव करायला. जाऊ दे ना राव बघू उद्या काय गरज पडली तर.' हा असा विचार करणारे देखील अनेक जण असतात.

गंमत वाटेल पण एक खरं आहे बर का, तर काही लोकं फॅशन म्हणून देखील समाजकार्य करतात बर का. अगदी मोठ्या आवाक्यात सांगतात,  'हो बाई मी समाजकार्याचे नाव एक कोर्सच केलाय मागे एकदा.  तर मला  समाजकार्य करायला फार आवडतं.' 

हे सगळं बरोबर आहे.  किंवा बरोबर आणि चूक याचं गणित मांडण्यापेक्षा मला बऱ्याचदा असं वाटतं की आपल्याला काय बरोबर वाटतं हे करणे योग्य आहे. 

तरी यात काहींचं म्हणणं आहे की समाजकार्य करण्यापेक्षा म्हणजे समाजकार्य तर केलंच पाहिजे नाही असं नाही पण समाजकार्य करण्यापेक्षा आपल्या घरातलं सगळ्यांचं सुरळीत चाललंय की नाही, याची देखील खात्री केली गेली पाहिजे.  नाहीतर काय होतं काही घरांमध्ये समाजकार्य समाजकार्य करण्यापेक्षा घरात नाही व्यवस्थित शांती समाधान क्लेश सतत सुरू असतात आणि बाहेर समाज कार्य यापेक्षा आधी आपण आपलं कुटुंब मग आजूबाजूचा समाज मग आजूबाजूची आपण म्हणूयात कॉलनी असं करत करत आपण आपलं कार्य सुरू ठेवला पाहिजे असं मला वाटतं. आपल्या घरातूनच पहिले समाजकार्य सुरू झाले पाहिजे. घरातल्या काही अडचणी असतील तर त्या आधी सोडवणे.  हे त्या अडचणी न बघता बाहेरची कार्य करत राहायची.  हे कितपत बरोबर आहे किंवा चुकीचा आहे, हा एक प्रश्नच आहे बाबा. नाहीतर समाजाला सुधरवायला जाल. पण घर विस्कळीत, किंवा पसरलेलं, असं तर होत नाही ना. याची थोडीशी काळजी घेतली पाहिजे बर का.

खरंतर प्रत्येकाने ठरवलं ना तरी सहज शक्य आहे. प्रत्येकाने फक्त एवढंच ठरवायचं आधी माझं घर समाधानी आहे की नाही.  त्यांच्या सगळ्या गरजा पुरवल्या गेल्या की नाही. एकदा घर झालं की मग आजूबाजूचा समाज, मग त्याही पलीकडचा जो समाज असतो, आणि मग असं करत करत इतर लोकांचं गरजा किंवा समाधान करणं म्हणजे समाजकार्य करणं असं मला वाटतं. म्हणून तर म्हटलं ना समाजकार्य हे आपल्या घरापासून सुरू झालं पाहिजे. नाहीतर घरात नाही शांती समाधान आणि चाललेत जगात शांती पसरवायला. 

अरे सोशल वर्क आजकालची फॅशन आहे भाऊ केलेच पाहिजे ना राव. घर काय घरातच आहे.  घराकडे काय उद्या पण बघता येईल उद्या नाही परवा बघता येईल परवा नाही तर तेरवा बघता येईल. घरातल्यांची काय नेहमीची भुण-भुण आहे. 

अहो असा देखील विचार कित्येक लोक करत असतात आता काय सांगायचं. 

वसुधैव कुटुम्बकम वगैरे असे मोठे मोठे शब्द वापरायचे नाही. वापरले पाहिजे त्याबद्दल माझं काहीच दुमत नाही. आणि तसं कार्य केलं पाहिजे याबद्दल देखील वाद नाही. परंतु सगळ्यात आधी माझे आई-वडील माझी बायको किंवा माझा नवरा माझी मुलं हे समाधानी आहेत का. ते झाल्यानंतर माझ्या आजूबाजूचा परिसर आजूबाजूच्या व्यक्ती माझे नातेवाईक हे समाधानी आहेत का. असा जर विचार केला गेला तर खरं समाजकार्य. 

काय मग मंडळी पटतंय ना?  करूयात ना सुरुवात आपल्या घरापासूनच समाजकार्याची.  हा विडा उचलूयात ना सगळे मिळून. कारण आपण सुधारलो, तर समाज सुधारणारच ही खात्री बाळगा मित्रांनो


सौ अर्चना दीक्षित

 


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा