गुरुवार, १७ ऑगस्ट, २०२३

मी सौंदर्यवती (१३बॅगवती)

 'मैनावती झाली बॅगवती'

' ए अगं थांब थांब किती किती या बॅगा गोळा करशील?  घरी आधी त्या १५-२० प्रकारच्या पडल्या आहेत, त्यांची विल्हेवाट लाव ना. मग घे नवीन विकत. मी घेऊन देतो स्वतः हून वाटल्यास. पण त्या आधी यांचं कर ग काही.' 

'अहो आता काय बाई सांगू तुम्हाला. अहो आजकाल फॅशन आहे वेगवेगळ्या ड्रेस वर वेगवेगळ्या बॅगस् अय्या इश्श्य आणि बॅगस् काय म्हणता हो. त्यांना लेडीज पर्स म्हणतात. तुम्ही ना. जाऊदे तुम्हाला नाही कळायचं हे आमच्या बायकांचे फॅशनचे प्रकार. मला घ्यायची आहे ही. आणि इथे स्वस्तात मिळत आहे बरं का. तो पलिकडच्या गल्लीत दुकानदार आहे, तो खूप महागात विकतो ना.'

असं म्हणत बायका कधी कधी उगाच खरेदी करत असतात. पण खरं सांगू का पुरुष पण काही कमी नाही बरं का.  ते देखील तितकेच फॅशनच्या आहारी जातात की. त्यांचे फॅशनचे प्रकार वेगळे एवढेच. त्यांना आवड असते गॅजेट्सची. मग काय एखादं मोबाईल शॉप दिसलं की यांचे पाय आपोआप तिकडे वळतात. आणि मग सगळ्या मोबाईलचे फिचर्स जाणून घेत, सर्व समजल्याचा आविर्भाव आणत वावरत असतात. 

हा हा असो.

तर पॉंईंटाचा मुद्दा काय तर मैनावती होते बॅगवती. तर इतक्या सर्व बायकांमधून एखादी स्त्री अशी असते की जी या फॅशनच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करते. म्हणजे कोणाला कशा प्रकारच्या बॅगस् आवडतात? त्यांची नेमकी गरज काय आहे? त्यांचा उपयोग काय आहे? कोणत्या ठिकाणी कसा माल विकला जाईल? कापडी असावी की लेदरची असावी? का दोन्हीही गोष्टींचे कॉम्बिनेशन असावे?  त्यावरचे डिझाईन, त्यांचा रंग कसा असावा? त्यांची विक्री कशी होईल? त्यांचा प्रॉफिट कितपत होईल?  कोणत्या भागात खप जास्त आहे? अशा एक ना अनेक प्रश्नांची उत्तरे सोडवत एखादी मैनावती ही बॅगवती बनते. असा सगळा विचार करणारी व्यक्ती खरोखर आदर्श आहेत. मग ती स्त्री असो किंवा पुरुष.

आपण केवळ फॅशन फॅशन करत मागे जातो. कोणी तरी एखादे ट्रेंड सेट केले की त्याच्या मागे पळतो. किंवा एखाद्या मुव्ही मधील दृश्य पाहून अथवा टिव्ही सेरिअल पाहून लगेच बाजारात जाऊन हूबेहूब गोष्ट आणायला पळतो. ' अहो तो आपण माधुरीचा सिनेमा पाहिला ना मागच्या आठवड्यात. तिने त्या मजंटा साडीवर जशी पर्स घेतली आहे ना, मला अगदी तशीच हवी आहे बरं का. पण कलर वेगळा हं. म्हणजे माझ्याकडे ती इंडिगो कलरची साडी आहे ना, माझ्या भाचीच्या साखरपुड्याला मिळालेली नाही का. हां तर त्या साडीवर परफेक्ट मॅचींग बॅग हवी आहे मला हं. तिसऱ्याच रंगाची घेतली गेली तर मला बाई आऊट डेटेड म्हणतील.'

या सगळ्या भानगडीत हे नेमके रंग डोळ्यासमोर आणायला पती देवाला बरीच मेहनत घ्यावी लागते. या सर्वांची सांगड घातली की तेव्हा कुठे ही खरेदी पूर्णत्वास येते. 

मजेदार आहे ना हो. आपल्याला अगदी मॅचींग बॅग हवी असते. नाही तर  गॉसिपिंगला विषय मिळतो. 'अग त्या दिवशी ना सीमा वहिनी स्वत:ला मॉड समजणाऱ्या अगदीच बाई आऊट डेटेड वाटत होत्या. त्यांची पर्स बिलकुल मॅचींग नव्हती बाई. माझं नसतं बाई तसं. मला तर ज्या रंगाचा ड्रेस किंवा ज्या रंगाची साडी त्याच रंगाची बॅग घ्यायला आवडते. हे तर मला ना म्हणतातच, यु आर ए रिअल बॅगवती. इश्श्य आमचे हे पण ना.'

पण मी म्हणते कशाला हो ही बरोबरी आणि हा अट्टाहास नको त्या गोष्टींचा. काय करणार नाही एखाद्याला हे पटत तर सोडून द्या ना. 

बघितला ना दोन मैनावती मधला फरक. पण काय बाबा फॅशन म्हटली की फॅशन. मग मैनावती बना की बॅगवती. ठरवा राव तुमचं तुम्हीच.


सौ अर्चना शिशिर दीक्षित 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा