'आओ खेल खेल मे'
माझा हा लेख म्हणजे जरा या आधीच्या लेखाचा पार्ट टु म्हटलात तरी चालेल हं. खरं तर या ऑनलाईन गेम्स वर खुप काही लिहिता येईल. हा विषयच असा आहे. सो कॉल्ड आजकालची फॅशन. फॅड म्हणा ना.
पण खरोखर घराघरात हे दृष्य बघायला मिळते. जो येतो तो त्याच्या नादाला लागला आहे. त्यामुळे कोणाला बोलायचे आणि काय समजावून सांगायचे, हा देखील एक प्रश्न पडतो. त्यामुळे होणारे परिणाम किंवा दुष्परिणाम यांचा विचार सुद्धा केला जात नाही. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळे या जगात पार रममाण होऊन गेले आहेत. इतकेच काय गमतीत सांगायचे झाले तर कोणाच्या घरी गेले तरी, ' अहो जरा वाय फायचा पासवर्ड मिळेल का हो ' हे विचारायला पण मागे पुढे पाहत नाहीत.
काही जण तर जणू कोणी भेटायला आले तर ट्रे मध्ये पाण्याच्या ग्लासच्या ऐवजी वायफाय चाच पासवर्ड देत असावेत. हाहा. जोक्स अपार्ट हे असले व्हायला फार काही वेळ लागणार नाही, असे वाटते.
म्हणजे मोठ्या उत्साहात एखादे स्नेहसंमेलन आयोजित करतात. बरं का. 'खुप दिवस झाले बाई आपण त्या अमक्या अमक्या लोकांना घरी बोलावलेच नाही ना. या शनिवारी बोलवायचे का हो? मागे त्यांनी आपल्याला बोलावले होते ना. आपण पण उरकून टाकू. म्हणजे उगाच बोलायला नको कोणी, आपण बोलावलं नाही म्हणून. आणि हो बाहेरून काही पदार्थ ऑर्डर करुयात. म्हणजे त्या स्वयंपाक घरात मी अडकुन नाही राहणार. हो ना हो. तुमचं काय मत आहे? ' तो नवरा पण फोन मधून डोकं वर काढत, काही बोलणं समजलं नसलं तरी बायको काही बोलायला नको म्हणून दुजोरा देऊन मोकळा होतो.
जेष्ठ नागरिक तर मोबाईल नवीन हातात आला तर एक मिनिट सोडत नाहीत. जणु एका दिवसात त्यांना शिकायचा आहे, तो कसा वापरतात ते. मग काय ते देखील तासंतास त्या मोबाईल वर वेळ घालवला सुरुवात करतात. नातवंडांना तेवढंच फावतं. आजी आजोबांना नवी गॅजेट्स शिकवायच्या निमित्ताने आपण पण वेळ वाया घालवत बसतात.
त्यामुळे एकमेकांमध्ये संवाद कमी होऊ लागले आहेत, हे लक्षातच येत नाही कोणाच्या. मुलं तर एकलकोंडी बनत आहेत. हे वेळीच लक्षात आले तर ठिक. नाही तर नुकसान व्हायला फार काळ लागत नाही.
कुठे बाहेर फिरायला गेले तरी त्या कार मध्ये काय किंवा कोणत्याही वाहतूक मार्गाने गेले तरी आजुबाजुला मागे पळणारी झाडे, डोंगर, निसर्ग, खरं म्हणजे सृष्टीसौंदर्य न बघता सगळ्यांचे लक्ष त्या मोबाईल गेम मधेच. काही सांगायला जा तर ओरडतात, ' अगं आई थांब ना जरा. तो ॲंग्री बर्ड गेम खेळतो आहे ना यार. काही राऊंड राहिले आहेत. आणि मला नाही त्या निसर्ग बघण्यात इंटरेस्ट. कसलं बोर आहे बाहेरचे दृश्य.' त्याच गेम मध्ये धाकटी बहीण किंवा भाऊ देखील मग्न होऊन जातात.
कोणाच्या घरी गेले तरी हाच प्रकार. पण मग त्यामुळे ना ही मुले संवाद साधण्याच्या दृष्टीने कमी पडत जातात. कोणाशी काय आणि कसे बोलायचे हे त्यांना कळतच नाही. कारण विषय पण समजत नाही त्यांना. यामुळे कुठे जायची त्यांना इच्छा नसते. कोणी घरी आलेले नको असते. हे दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. शाळेतील डीबेटस् मधे काय की इतर विषयांवर चर्चा करण्यात कमी पडतात. पण मग आपल्याला एखाद्या विषयावर बोलता येत नाही, यांचा मनात कुठेतरी न्युनगंड निर्माण होतो जातो.
म्हणून तर मग एखाद्या मार्गदर्शकाची मदत घ्यावी लागते.
मला काय वाटतं, या अशा सगळ्या भानगडीत पडण्यापेक्षा घरात नियम केला पाहिजे, काही अगदीच गरजे पुरता मोबाईलचा वापर करावा. सगळे एकत्र आले की मग तो बाजुला ठेवून मस्त वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली पाहिजे. गंमतीत सांगायचे तर रोज गोलमेज परिषद (Round Table Conference) भरली पाहिजे घरात. आणि या परिषदेत घरातील प्रत्येकाची सहभागी असली पाहिजे, याची खात्री करा हं. शिवाय थोडं थोडं का होईना पण प्रत्येकाला बोलते केले गेले पाहिजे.
मला माहीत आहे, एकदम बदल घडवणे शक्य नाही. पण हळूहळू करत रोजे रूटीन बनवत गेले तर अशक्य असे काहीच नाही.
काय मग भरवायची गोलमेज परिषद आपापल्या परीने आपापल्या घरी?
सौ अर्चना शिशिर दीक्षित
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा