गुरुवार, १७ ऑगस्ट, २०२३

मी सौंदर्यवती (16 नो एसी)

 आजकाल ना ऐकावं तेवढं नवलच आहे. जितकं तुम्ही लोकांशी गप्पा माराल आणि तितक्या काय काय नवीन नवीन गोष्टी ऐकायला मिळतात. ते खरंच नवलच आहे. आणि त्या सगळ्याची फॅशन झालेली असते म्हणजे हे अजूनच नवीन वाटतं मला.

आता हा पुढील फॅशनचा प्रकार ऐकून ऐकून तुम्हाला जर आश्चर्य वाटलं नाही तर का. ऐका तर मग या मैत्रिणींच्या गप्पा.

अगो आजकाल इतका उन्हाळा आहे ना काय सांगू वैताग आलाय आता. आणि फॅनचं तर काही वारच लागत नाही बाई काय त्रास आहे ना काय कराव समजत नाही बाहेर जायची इच्छा होत नाही घरात नुसतं घाम घाम घाण काय करावे. बाकी सगळं सोड संध्याकाळी ना तेवढ्यासाठी वॉकला जायची पण इच्छा होत नाही बाई माझी.  इतक्या गर्मीत कुठे जायचं बाई. मग काय मी आपलं मस्त स्प्लिट एसी घेऊन ठेवला घरात छान वाटतंय. आणि त्या खोलीत जाऊन बसते. आजकाल तर ना मी एका बाईला स्वयंपाकाला लावलाय. मग काय स्वयंपाक घरात जायला नको, आणि जेवण बनवायला नको बाई. कुठे बाई मरणाच्या गर्मीत स्वयंपाक करायचा. मस्तपैकी एसीमध्ये बसून छान छान वेगवेगळ्या सिरीयल बघते बाई मी. पण काय बाई मध्येच लाईट गेली ना की मग माझी चिडचिड होते. कारण एसी बंद होतो ना. मग लागतं परत उकडायला. आपल्याकडे लोड शेडिंग किंवा लाईट जाणं हे तर इतकं कॉमन आहे ना. पण जाऊ दे जेवढा वेळ लाईट असतात ना मी आपली तेवढ्या वेळेस बसते ग बाई. मीना तू काय करतेस. तू पण घेतला असशील ना एसी किंवा स्प्लिट एसी. उन्हाळ्याचे कसे दिवस काढतेस तू? थोडं बिल जास्त येतो पण ठीक आहे गं सोय झाल्याशी मतलब. नाही का गं मीना तुला काय वाटतं? 

अगं ज्योती खरंय तुझं म्हणणं एसी असली की सगळी सोय असते मान्य मला. आणि मलाही हे पटायचं खरंतर. पण ना माझी पोस्टींग अशा ठिकाणी झाली जिथे ना एसी न कसली सोय मग मला त्रास व्हायला लागला. तुला सांगते तेव्हा ना मी एके ठिकाणी जाऊन, म्हणजे साउथ ला एका शहरात जाऊन ना एक कोर्स असतो अगं. म्हणजे सांगते सांगते तो कोर्स म्हणजे तुम्ही एसी शिवाय कसे राहू शकतात या विषयावर. तर तिथे ना तुम्हाला शिकवलं जातं, की एसी शिवाय नैसर्गिक वातावरणात तुम्ही कसे राहू शकता. निसर्गाच्या सानिध्यात राहून तुम्ही निसर्गाला कसं आत्मसात करू शकता. हा कोर्स इथे मी केला ग आणि तेव्हापासून खरं सांगू का, मला फरकच पडत नाही. घरात एसी असला काय किंवा नसला काय. मी राहू शकते बाई अशी. काही दिवसांचा कोर्स असतो हा. सुरुवातीला ऐकल्यावर मला जरा नवलच वाटलं. पण म्हटलं चला करून तर बघूयात.  म्हणतात ना केल्याने होतची आहे रे आधी केलेची पाहिजे. तुला खोटं वाटेल पण मी गेले त्या कोर्सला. एक-दोन दिवस वाटतं की आपल्याला  नाही शक्य हे. पण मग काही नाही गं हळूहळू होते सवय त्याची. आता मला विचारशील ना, तर खरंच मला फरक नाही पडत एसी किंवा इव्हन फॅन चा देखील. मला वाटतं आपल्या मनावर ताबा असला ना, आपल्या मनावर कंट्रोल हो असला, नक्की सगळं सहज शक्य होतं असं माझं मत आहे हं. त्यामुळे लोड शेडिंग झालं काय किंवा लाईट गेले काय मला नाही फरक पडत. मी तर म्हणते जमलं ना तर तु पण त्या कोर्सची माहिती काढून घेऊन नक्की हा कोर्स कर. अगं त्या एसीत राहून राहून ना सगळी दुखणी आपण जवळ बोलवत असतो. आणि आजकाल हा कोर्स करण्याची फॅशन झाली बर का ग. ज्योती कसली आजकाल फॅशन होईल काही सांगता येत नाही बाई. काय आहे ना. पण जे काही आहे, मला तर याचा अनुभव चांगला आलाय. तर मग तू पण विचार कर असं मला वाटतं. आणि कर की फॅशन आत्मसात. नाहीतरी टीव्हीवर आजकाल ऍड असतात श. इलेक्ट्रिसिटी वाचवा, ज्या खोलीतून बाहेर जाल, तिथली लाईट फॅन सगळं बंद करा. निसर्गाच्या सानिध्यात जा. अशा वेगवेगळ्या असतात. व त्यापेक्षा हा कोर्स करून जर आपल्याला काही समाधान सुख मिळत असेल तर काय ग वावगं त्याच्यात. 

अगं ज्योती, मीना तुमच्या गप्पा ऐकून ना गंमत देखील वाटली. मजा पण आली. आणि पटलं देखील काही गोष्टी. पण मी सांगू माझ्या लग्नाला बावीस वर्षे झाली आहेत. पण मी अजूनही एसी वगैरे घेतलं नाही बर का. माझ्या पण पोस्टिंग अशा ठिकाणी झाल्या आहेत, की लोक म्हटले आता तर काय ही 100% एसी घेणार. पण नाही बाई मी नाही घेतला एसी. आजकाल तर माझे मिस्टर पण म्हणतात, बरं झालं तू एसी ची सवय नाही लावून घेतली. त्यामुळे अनेक उपक्रमात तू सहभागी होऊ शकतेस. घराला छान बाल्कनी आहे, तिथे जाऊन छान वाचन करू शकतेस, स्वयंपाक घरात जाऊन वेगवेगळ्या रेसिपीज ट्राय करू शकतेस, आणि बाहेरच्या जगात वावरून बाहेरच्या जगाची देखील छान माहिती घेऊ शकतेस. प्रत्येक गोष्ट छान एन्जॉय करू शकतेस. आणि तुझ्या या स्वभावामुळे आम्हाला देखील आता तीच सवय लागलीये त्यामुळे आम्ही पण वेगवेगळ्या उपक्रमात आम्हाला बिझी ठेवायचा प्रयत्न करतो. 

काय मग रसिक  वाचकांनो. कशी वाटली ही नो एसीची फॅशन. करायची का आत्मसात? आणि हरकत काय आहे जर चांगली फॅशन असेल तर, करूयात कि हो आत्मसात. 

पण हे माझं वैयक्तिक मत आहे बरं का.  प्रत्येकाला पटलच पाहिजे असं काहीही माझा आग्रह नाही. कोणत्या फॅशनच्या किती आहारी जायचं, ते आपलं आपणच ठरवायचं.


सौ अर्चना शिशिर दीक्षित 


मी सौंदर्यवती (१५ आपला समाज)

 काय करते आहेस? झाली का सगळे काम सकाळची? झालीस का निवांत? का अजून काही करणं बाकी आहे? तुला काय बाई, बर आहे तुझ्याकडे कामाला बाई आहे. सगळी कामं ती करत असेल. तू आपली मस्त हातावर हात ठेवून बसत असशील. आमचं तसं नाही ना. आमची कामवाली बाई कधी येते, कधी नाही येत, कधी दांड्या मारते. मग काय सगळीच कामं आम्हालाच करायला लागतात. काय सांगणार माझी बाई गेली सुट्टीवर. काय तर म्हणे, आजारी पडली. दोन दिवस येऊ नाही शकणार. मग काय तर सकाळपासून बसले दोन भांडी स्वयंपाकाचा पसारा घेऊन. उगवेल परवा असे म्हटली आहे, बघूया. या आजकालच्या बायांची ना फॅशनच झाली आहे, दर काही दिवसांनी सुट्टी घ्यायची. तुमच्याकडे होतो का हा त्रास? किंवा तिकडे आहे का ही फॅशन बायांनी सुट्टी घ्यायची? 

अगं मीना काय म्हणतेस तू? कसली फॅशन आणि कसलं काय. आणि फॅशन कशाला म्हणायचं याला. मी तिला महिन्यात ना एक दोन दिवस सुट्टी देते त्यांनाही वाटतं ग. बाहेर जावं मुलांबरोबर किंवा कुटुंबाबरोबर वेळ घालवावा. त्यांच्यासोबत फिरावे. नवीन नवीन त्यांनाही ठिकाण दाखवावी. काहीतरी चांगलं खावं प्यावं. आपण जसा आपला स्वतःचा विचार करतो. तसे त्यांचे इतर आयुष्य आहे.  मग ह्या सुट्टीची फॅशन का कसली म्हणायची? मला विचारशील तर मला तर वाटतं, त्यांना महिन्यातुन एकदा किंवा दोन दिवस सुट्टी दिली गेली पाहिजे. शेवटी ती पण माणसं. त्यांना भावना नाही का? त्यांना काही इच्छा नाही का? आपल्याला पण तर बदलत्या फॅशन प्रमाणे वागायला आवडतं जगायला आवडतं छान छान राहिला आवडतं. तसंच त्यांच्याही तर काही आवडीनिवडी आहेत. आणि का नाही ग. का नसाव्यात? त्यांनी पण आजकालच्या फॅशन प्रमाणे राहायला पाहिजे की. सुट्टीचा आनंद घेतला पाहिजे की. असं कसं म्हणून चालेल? आपण समोरच्याला समजून घेतलं ना, तर समोरचा आपल्यालाही समजून घेतो. त्याचा अगदी फायदा उचलत असतील म्हणजे गैरफायदा उचलत असतील तर ते चुकीचं. पण तो वेळ ते योग्य ठिकाणी घालवणार असतील, तर काही हरकत नाही. त्यांच्या देखील काही गरज असतात ग. हे काम झाल्यानंतर बायांना घरातला एक सदस्यच बोलून जातात. त्यांचा लगेच पगारच कट करणं मला नाही पटत नाही बाई. 

हे असे संवाद आपण वारंवार ऐकत असतो. किंवा आपणही कोणाशी करत असतो. पण खरं तर आपणही सगळ्यांना समजून घेतलं पाहिजे.  तर काहींना सवय असते, भाजी बाजारात किंवा लोकल मार्केट म्हणतो ना आपण तिथे उगीचच भाव करायची. म्हणजे बार्गेन करायची हो. उगाचच त्या भाजी बाजारात हुज्जत घालत बसतो. भाजीवाल्याची एवढी महागच का दिली. याची क्वालिटी तशी का ती पुढची माहिती आहे, इतके कमी पैसे घेते. तिकडे गेले तर एवढ्या पैशात मिळू शकते. तू काही फारच महाग विकतेस. काही तर पैसे कमी कर नाहीतर मी नाही घेणार तुझ्याकडून पुढच्या वेळी भाजी आणि फळ पण. मी त्या पलीकडच्या दुकानातून घेत जाईन हं. या अशा प्रकारच्या संवादाची जणू फॅशन झाली आहे पण काय करणार असतात काही काही लोक अशी खरं तर ना हीच लोक जेव्हा मॉलमध्ये वगैरे जातात त्यावेळी अगदी महागाच्या दुकानातून म्हणजे ब्रांडेड गोष्टी खरेदी करण्यास त्यांना फार रस असतो बरं का पण भाजी बाजारात मात्र खूप जर घालताना बाई नाही आली म्हणून तिच्याशी हुज्जत घालताना नेहमीच आपल्याला दिसतात आणि काही लोक यातली बाकी ठिकाणी म्हणजे उगाचच समाजकार्य करताना दिसतात म्हणजे रोजच्या व्यवहारातील किंवा रोजच्या आयुष्यातील जी लोक समोर असतात त्यांना मदत करण्यापेक्षा समाजकार्य करण्यातच त्यांना फार रोज असतो खरं तर ना म्हणजे माझं अगदी पर्सनल मत बर का की रोज तुमच्या आयुष्यात येणारे लोकांनाच तुम्ही थोडी थोडी मदत केली ना म्हणजे बाईच्या भावना समजून घेणे तिची परिस्थिती समजून घेणे तिच्याशी योग्य वागणूक देणे तिला तर तेही एक समाज कार्य आपल्याच जवळच्या मदत करणं आणि नको तिथे उचलत न घालणार ते योग्य उगाचच गरज नसताना मोठ्या मोठ्या मॉल मधून किंवा ब्रॅण्डेड दुकानातून नुसतीच खरेदी करत राहण्यापेक्षा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये म्हणजे मी म्हटलं तसं छोट्या छोट्या किंवा आपल्या जवळच्या लोकांना मदत केली तर ते खरं समाजकार्य हो साधं म्हटलं तसं की आधी घरच्यांना बघा माझ्या आधीच्या लेखाप्रमाणे पण की आधी आपल्या आसपासच बघा घरच्यांना बघा म्हणजे घरच्यांच्या गरजा राहिल्या बाजूलाच आणि तिसऱ्यांच्याच भागवत आहे हे कुठलं समाजकार्य त्यापेक्षा आपल्या घरातूनच समाजकार्य सुरू करूयात ना घरच्यांच्या गरजा भागून घरच्यांच्या जवळच्या म्हणजे आज स्पष्ट लोकांच्या गरजा त्यांचे काही प्रॉब्लेम असतील तर ते समजून घेणार आणि ते सोडवणे हे खऱ्या अर्थी समाजकार्य असं मला वाटतं आता मी बरोबर आहे का चूक आहे हेही कधी कधी व्यक्तीच सापेक्ष असते ना. म्हणजे भीक मागणाऱ्याला भीक नका देऊ काय मला मान्य आहे. कारण नाहीतर त्याला तशीच फुकट खायची सवय लागेल. पण जे कष्टकरी आहेत मेहनत करणारे आहेत त्यांना त्यांचे कष्टाचा चीज होईल असा तर काही केलं गेलं पाहिजे ना.

हो मला माहिती आहे की हा लेख थोडासा आधीच्या लेखाला धरूनच आहे .पण काही हरकत नाहीये. कारण काही लोक खरोखर असंच वागतात हो. म्हणून थोडी कळकळीची विनंती की समाजकार्य करायचा आहे ना, तर आपल्या आधी घरापासून सुरू करावे. समाज कार्य करायचं असेल ना तर आपल्या घरापासून किंवा आपल्या लोकांपासून सुरुवात करावं आपल्या लोकांना दुर्लक्ष करून किंवा आपल्या समाजाशी वैर साधून, दुसऱ्या समाजाचे भलं करायचं, हे कुठलं आल्यावर समाजकार्य. काय मग तयार आहात ना नवीन फॅशन करायला?  नवीन फॅशन म्हणजे नवीन फॅशन प्रमाणे आपल्याच लोकांना आधी महत्त्व द्यायला? चला तर मग आपल्या समाजाचा कार्य करूयात.


सौ अर्चना दीक्षित

मी सौंदर्यवती (१४ समाजकार्य)

 'वसुधैव कुटुम्बकम्'

अहो आता काय सांगणार आजकाल समाजकार्य ही पण एक फॅशनच व्हायला लागली आहे. कितीतरी लोक असतात ती खरोखर मन लावून समाजकार्य करत असतात.  म्हणजे अक्षरशः स्वतःला वाहून घेतात या समाजकार्यासाठी. आणि मी म्हणते त्यात चुकीचं नाही ना,  बरोबरच आहे.  आपण जर या समाजाचे काही घटक आहोत. तर या समाजाला आपल्याकडून काहीतरी परत दिलं गेलं तर त्यात एक वेगळच समाधान असतं. आणि यातूनच सामाजिक बांधिलकी याची देखील भावना निर्माण होते. आणि या सामाजिक बांधिलकीची जाणीव एका दोघाला असून उपयोगी नाही, तर सगळ्यांना किंवा अनेकांना याची जाणीव असली पाहिजे. मग तो तुमच्या आजूबाजूचा समाज असो किंवा इतर कुठेही असो. आणि या समाज म्हणजे एखादी जात धर्म असं न बघता माणसाने माणसासाठी केलेली मदत किंवा सहकार्य म्हणजे समाजकार्य असे मला वाटतं हं. यातूनच आपल्यातील जी माणुसकी असते तीही जागृत राहते. आपल्यामुळे एखाद्या व्यक्तीचे किंवा एखाद्या कुटुंबाचे एवढेच काय एखाद्या समाजाचे जर चांगले होत असेल आणि त्यातनं जे मिळणार समाधान असते ते खरोखरच छान नाही का? अहो इतकच काय पण आपण जे कार्य करत असतो,  काम करत असतो ते आपल्या घरातली प्रत्येक व्यक्ती बघत असते आणि त्यापासून ते प्रोत्साहन / प्रेरणा पण घेत असतात. 

बऱ्याचदा आपण कित्येक घरांमध्ये बघतो की अख्या जगाच्या  हे समाजकार्याचा जणू विडा उचलत असतात. अख्या घरात म्हणजे घरातले आजी, आजोबा, आई, वडील, मुलं हे देखील त्या समाजकार्यासाठी झटत असतात. हे किती प्रेरणादायी आहे, असं मला वाटतं. अशा घरातील वातावरण पण बघा नेहमी समाधानी, आनंदी असंच आपल्याला दिसून येतं. अशा घरातील व्यक्तींच्या समाजाकडून खूप काही अपेक्षा नसतात. पण आपण समाजासाठी काहीतरी करत राहणार, ही मात्र त्यांची नेहमीच तळमळ असते. वसुधैव कुटुम्बकम अशीच भावना त्यांच्या मनात असते. अहो हे खरंच वाखाणण्यासारखीच गोष्ट आहे. जगातल्या सगळ्यांनाच नाही जमत बर का हे. आणि जमलंच पाहिजे असाही माझा आग्रह नाही. केवळ सामाजिक बांधिलकीची भावना असावी एवढेच माझं मत आहे. 

आणि हे सगळं करताना मला समाजाकडून काय मिळेल याची अपेक्षा करणं चुकीचं असं माझं मत आहे. नाहीतर कधी कधी काहींच्या मनात असे येतं, 'मी त्याला मदत केली पण त्यांनी माझ्यासाठी काय केलं. काहीच नाही ना. मग मी कशाला विचार करू, द्या सोडून, मी नाही करणार यापुढे कोणाची मदत. त्या व्यक्तीचा किंवा त्या समाजाचा मला काय उपयोग. मला काय घेणं समाजाचं.  मी नाही समाजकार्य वगैरे करत बसणार. माझं माझं काही कमी आहे, की मी त्या समाजाचा घेऊन बसू. कोणी सांगितलं नसती उठा ठेव करायला. जाऊ दे ना राव बघू उद्या काय गरज पडली तर.' हा असा विचार करणारे देखील अनेक जण असतात.

गंमत वाटेल पण एक खरं आहे बर का, तर काही लोकं फॅशन म्हणून देखील समाजकार्य करतात बर का. अगदी मोठ्या आवाक्यात सांगतात,  'हो बाई मी समाजकार्याचे नाव एक कोर्सच केलाय मागे एकदा.  तर मला  समाजकार्य करायला फार आवडतं.' 

हे सगळं बरोबर आहे.  किंवा बरोबर आणि चूक याचं गणित मांडण्यापेक्षा मला बऱ्याचदा असं वाटतं की आपल्याला काय बरोबर वाटतं हे करणे योग्य आहे. 

तरी यात काहींचं म्हणणं आहे की समाजकार्य करण्यापेक्षा म्हणजे समाजकार्य तर केलंच पाहिजे नाही असं नाही पण समाजकार्य करण्यापेक्षा आपल्या घरातलं सगळ्यांचं सुरळीत चाललंय की नाही, याची देखील खात्री केली गेली पाहिजे.  नाहीतर काय होतं काही घरांमध्ये समाजकार्य समाजकार्य करण्यापेक्षा घरात नाही व्यवस्थित शांती समाधान क्लेश सतत सुरू असतात आणि बाहेर समाज कार्य यापेक्षा आधी आपण आपलं कुटुंब मग आजूबाजूचा समाज मग आजूबाजूची आपण म्हणूयात कॉलनी असं करत करत आपण आपलं कार्य सुरू ठेवला पाहिजे असं मला वाटतं. आपल्या घरातूनच पहिले समाजकार्य सुरू झाले पाहिजे. घरातल्या काही अडचणी असतील तर त्या आधी सोडवणे.  हे त्या अडचणी न बघता बाहेरची कार्य करत राहायची.  हे कितपत बरोबर आहे किंवा चुकीचा आहे, हा एक प्रश्नच आहे बाबा. नाहीतर समाजाला सुधरवायला जाल. पण घर विस्कळीत, किंवा पसरलेलं, असं तर होत नाही ना. याची थोडीशी काळजी घेतली पाहिजे बर का.

खरंतर प्रत्येकाने ठरवलं ना तरी सहज शक्य आहे. प्रत्येकाने फक्त एवढंच ठरवायचं आधी माझं घर समाधानी आहे की नाही.  त्यांच्या सगळ्या गरजा पुरवल्या गेल्या की नाही. एकदा घर झालं की मग आजूबाजूचा समाज, मग त्याही पलीकडचा जो समाज असतो, आणि मग असं करत करत इतर लोकांचं गरजा किंवा समाधान करणं म्हणजे समाजकार्य करणं असं मला वाटतं. म्हणून तर म्हटलं ना समाजकार्य हे आपल्या घरापासून सुरू झालं पाहिजे. नाहीतर घरात नाही शांती समाधान आणि चाललेत जगात शांती पसरवायला. 

अरे सोशल वर्क आजकालची फॅशन आहे भाऊ केलेच पाहिजे ना राव. घर काय घरातच आहे.  घराकडे काय उद्या पण बघता येईल उद्या नाही परवा बघता येईल परवा नाही तर तेरवा बघता येईल. घरातल्यांची काय नेहमीची भुण-भुण आहे. 

अहो असा देखील विचार कित्येक लोक करत असतात आता काय सांगायचं. 

वसुधैव कुटुम्बकम वगैरे असे मोठे मोठे शब्द वापरायचे नाही. वापरले पाहिजे त्याबद्दल माझं काहीच दुमत नाही. आणि तसं कार्य केलं पाहिजे याबद्दल देखील वाद नाही. परंतु सगळ्यात आधी माझे आई-वडील माझी बायको किंवा माझा नवरा माझी मुलं हे समाधानी आहेत का. ते झाल्यानंतर माझ्या आजूबाजूचा परिसर आजूबाजूच्या व्यक्ती माझे नातेवाईक हे समाधानी आहेत का. असा जर विचार केला गेला तर खरं समाजकार्य. 

काय मग मंडळी पटतंय ना?  करूयात ना सुरुवात आपल्या घरापासूनच समाजकार्याची.  हा विडा उचलूयात ना सगळे मिळून. कारण आपण सुधारलो, तर समाज सुधारणारच ही खात्री बाळगा मित्रांनो


सौ अर्चना दीक्षित

 


 

मी सौंदर्यवती (१३बॅगवती)

 'मैनावती झाली बॅगवती'

' ए अगं थांब थांब किती किती या बॅगा गोळा करशील?  घरी आधी त्या १५-२० प्रकारच्या पडल्या आहेत, त्यांची विल्हेवाट लाव ना. मग घे नवीन विकत. मी घेऊन देतो स्वतः हून वाटल्यास. पण त्या आधी यांचं कर ग काही.' 

'अहो आता काय बाई सांगू तुम्हाला. अहो आजकाल फॅशन आहे वेगवेगळ्या ड्रेस वर वेगवेगळ्या बॅगस् अय्या इश्श्य आणि बॅगस् काय म्हणता हो. त्यांना लेडीज पर्स म्हणतात. तुम्ही ना. जाऊदे तुम्हाला नाही कळायचं हे आमच्या बायकांचे फॅशनचे प्रकार. मला घ्यायची आहे ही. आणि इथे स्वस्तात मिळत आहे बरं का. तो पलिकडच्या गल्लीत दुकानदार आहे, तो खूप महागात विकतो ना.'

असं म्हणत बायका कधी कधी उगाच खरेदी करत असतात. पण खरं सांगू का पुरुष पण काही कमी नाही बरं का.  ते देखील तितकेच फॅशनच्या आहारी जातात की. त्यांचे फॅशनचे प्रकार वेगळे एवढेच. त्यांना आवड असते गॅजेट्सची. मग काय एखादं मोबाईल शॉप दिसलं की यांचे पाय आपोआप तिकडे वळतात. आणि मग सगळ्या मोबाईलचे फिचर्स जाणून घेत, सर्व समजल्याचा आविर्भाव आणत वावरत असतात. 

हा हा असो.

तर पॉंईंटाचा मुद्दा काय तर मैनावती होते बॅगवती. तर इतक्या सर्व बायकांमधून एखादी स्त्री अशी असते की जी या फॅशनच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करते. म्हणजे कोणाला कशा प्रकारच्या बॅगस् आवडतात? त्यांची नेमकी गरज काय आहे? त्यांचा उपयोग काय आहे? कोणत्या ठिकाणी कसा माल विकला जाईल? कापडी असावी की लेदरची असावी? का दोन्हीही गोष्टींचे कॉम्बिनेशन असावे?  त्यावरचे डिझाईन, त्यांचा रंग कसा असावा? त्यांची विक्री कशी होईल? त्यांचा प्रॉफिट कितपत होईल?  कोणत्या भागात खप जास्त आहे? अशा एक ना अनेक प्रश्नांची उत्तरे सोडवत एखादी मैनावती ही बॅगवती बनते. असा सगळा विचार करणारी व्यक्ती खरोखर आदर्श आहेत. मग ती स्त्री असो किंवा पुरुष.

आपण केवळ फॅशन फॅशन करत मागे जातो. कोणी तरी एखादे ट्रेंड सेट केले की त्याच्या मागे पळतो. किंवा एखाद्या मुव्ही मधील दृश्य पाहून अथवा टिव्ही सेरिअल पाहून लगेच बाजारात जाऊन हूबेहूब गोष्ट आणायला पळतो. ' अहो तो आपण माधुरीचा सिनेमा पाहिला ना मागच्या आठवड्यात. तिने त्या मजंटा साडीवर जशी पर्स घेतली आहे ना, मला अगदी तशीच हवी आहे बरं का. पण कलर वेगळा हं. म्हणजे माझ्याकडे ती इंडिगो कलरची साडी आहे ना, माझ्या भाचीच्या साखरपुड्याला मिळालेली नाही का. हां तर त्या साडीवर परफेक्ट मॅचींग बॅग हवी आहे मला हं. तिसऱ्याच रंगाची घेतली गेली तर मला बाई आऊट डेटेड म्हणतील.'

या सगळ्या भानगडीत हे नेमके रंग डोळ्यासमोर आणायला पती देवाला बरीच मेहनत घ्यावी लागते. या सर्वांची सांगड घातली की तेव्हा कुठे ही खरेदी पूर्णत्वास येते. 

मजेदार आहे ना हो. आपल्याला अगदी मॅचींग बॅग हवी असते. नाही तर  गॉसिपिंगला विषय मिळतो. 'अग त्या दिवशी ना सीमा वहिनी स्वत:ला मॉड समजणाऱ्या अगदीच बाई आऊट डेटेड वाटत होत्या. त्यांची पर्स बिलकुल मॅचींग नव्हती बाई. माझं नसतं बाई तसं. मला तर ज्या रंगाचा ड्रेस किंवा ज्या रंगाची साडी त्याच रंगाची बॅग घ्यायला आवडते. हे तर मला ना म्हणतातच, यु आर ए रिअल बॅगवती. इश्श्य आमचे हे पण ना.'

पण मी म्हणते कशाला हो ही बरोबरी आणि हा अट्टाहास नको त्या गोष्टींचा. काय करणार नाही एखाद्याला हे पटत तर सोडून द्या ना. 

बघितला ना दोन मैनावती मधला फरक. पण काय बाबा फॅशन म्हटली की फॅशन. मग मैनावती बना की बॅगवती. ठरवा राव तुमचं तुम्हीच.


सौ अर्चना शिशिर दीक्षित 

मी सौंदर्यवती (१२ सौंदर्य प्रसाधने)

 "आपके त्वचासे आपके उमर का पता ही नहीं चालता है|"


झालं हे एक वाक्य ऐकण्यासाठी अहो बायका काय पुरुष देखील तितकेच उत्सुक असतात बरं का. 

आजकाल फॅशन प्रमाणे राहाणे सगळ्यांना आवडते. आणि मी म्हणते का नाही रहायचं. जरुर आपण या प्रमाणे रहायलाच हवं. जसं जग बदलत आहे तसं स्वतः मध्ये बदल घडवायला हवे. 

मग हे सौंदर्य जपण्यासाठी विविध उपाय करण्याचे मार्ग सुद्धा उपलब्ध आहेत.

'अग भावना ऐक ना मी काय म्हणतो मी ना आत्ता ऑनलाईन शॉपिंग वर काही गृह उपयोगी वस्तू मागवत आहे. तर बघ ना मला ना एक भारी फेस क्रीम आणि फेस लोशन दिसले आहे. खास पुरुषांसाठी. एवढ्यात जरा स्किन उन्हामुळे काळवंडलेली दिसते. काय म्हणते मागवून टाकु का. मागच्या आठवड्यात परश्याने पण बोलता बोलता म्हटले होते या प्रोडक्ट विषयी. आणि पहा ना आज सहज ऑनलाईन शॉपिंग करताना मला हे दिसले. जरा मागवून बघतो.'

'हो हो मागवाच बाई. एवढ्यात खरच तुम्ही काळवंडल्यासारखे वाटता हं. वापरून बघा. नाही आवडली तर देऊन टाका कोणाला.' अशी चर्चा काही ठिकाणी सुरू असते.

तर कुठे नवरा घरी आल्यावर क्षणाचा विलंब न करता बायको विचारते, 'अहो  काय मग आज मी कशी दिसते आहे?'

नवऱ्या पुढे मोठ्ठा प्रश्नच उभा राहतो. तो थोडा वेळ विचार करून म्हणतो, 'अरे वाह भारीच की. परिस्थित चाचपडत आज पार्लर मध्ये गेली होतीस वाटतं. मस्त ग मस्तच.' त्यावर बायको खुष होत म्हणते, 'अय्या, कसलं ओळखता हो तुम्ही. मान गए आपको. पण खरं सांगू का, मी ना पार्लर मध्ये नव्हते गेले. अहो त्या रेवाची आई आहे ना, तर त्या ना घरगुती सौंदर्य प्रसाधने तयार करून विकतात. आणि किंमत देखील आवाक्यातील आहे हो. म्हणून म्हटले घेऊन जरा वापरून बघावं. मला पण छान वाटत आहे हे.'

तर काही घरांमध्ये तर ब्रॅंडला महत्व दिले जाते. 'ज्याचं नाव त्यालाच भाव', असं मानतात. हो मी कुठे काही हरकत घेत आहे. बिलकुल चालेल कोणतेही सौंदर्य प्रसाधन. काय हवं ते वापरा. आता याचा अर्थ चुकीचा नका घेऊ. वाट्टेल ते वापरा, असा अर्थ नका हं घेऊ. 

कारण काय असतं, प्रत्येक व्यक्तीच्या त्वचेचा रंग, त्वचेची रचना, ऋतू नुसार होणारे त्वचेतील बदल, काही कारणांमुळे हवामानामुळे त्वचेवर होणारा परिणाम या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन मगच आपल्याला सौंदर्य प्रसाधने निवडावी लागतात. बरेच वेळा काहींची त्वचा संवेदनशील असते. कोणतेही क्रीम त्यांना लाऊन चालत नाही. योग्य मार्गदर्शन घेऊन, तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रसाधन वापरणे योग्य आहे. 

नाही तर टिव्ही वर जाहिरात बघुन लगेच तेच छान आहे. 'मग बघा ना करीना कपूर तेच वापरते. मी पण हेच विकत घेणार.' असं किंवा शाहरूख खान जे चेहऱ्यावर क्रीम लावतो, ते जगात भारी. आपण पण तेच लावणार ना भो. असं म्हणणं अयोग्य आहे हो. 

एवढेच काय पण आपण सौंदर्य प्रसाधनाच्या दुकनात जातो आणि त्यांनाच विचारतो, 'सध्या कोणते प्रोडक्ट जास्त छान हो भाऊ? मला तर बाई शुगर, नायका, मेबीलिन अशी नावे माहीत आहेत. ' दुकानदार काय त्याला विकायचेच आहे त्याच्या दुकानातील वस्तू. तो अजून अजून महाग प्रोडक्ट दाखवत आणि त्याविषयी अगदी पटवून सांगत, आपला माल विकत असतो. 

तर काही लोकं ऑनलाईन शॉपिंग स्वस्त पडते म्हणून त्यांच्या नादाला लागतात. 'कुठे त्या दुकानात जा, गाडीचे पेट्रोल खर्च करा, त्यापेक्षा हे ऑनलाईन शॉपिंग बरं बाई किंवा बरं बुआ. मस्त घर बसल्या हातात येते. आणि शिवाय स्वस्त पडतं. कोणते का प्रोडक्ट असेना. आपल्याला काय चेहऱ्यावर, हाताला काही तरी क्रीम फासले म्हणजे झाले. इथे कोणाला एवढा फालतुचा वेळ आहे राव.'

इथेच आपण जरासे चुकतो हो. मग त्याचा दुष्परिणाम आपल्यालाच भोगावा लागतो. म्हणून तर स्वतःची काळजी स्वतःला नीट जाणून घेऊन, योग्य मार्गदर्शन घेऊन करा. 

काय मग स्वतः साठी वेळ काढायला तयार ना? 


सौ अर्चना शिशिर दीक्षित 


मी सौंदर्यवती (११गेमस्)

 'आओ खेल खेल मे'

माझा हा लेख म्हणजे जरा या आधीच्या लेखाचा पार्ट टु म्हटलात तरी चालेल हं. खरं तर या ऑनलाईन गेम्स वर खुप काही लिहिता येईल. हा विषयच असा आहे. सो कॉल्ड आजकालची फॅशन. फॅड म्हणा ना.

पण खरोखर घराघरात हे दृष्य बघायला मिळते. जो येतो तो त्याच्या नादाला लागला आहे. त्यामुळे कोणाला बोलायचे आणि काय समजावून सांगायचे, हा देखील एक प्रश्न पडतो. त्यामुळे होणारे परिणाम किंवा दुष्परिणाम यांचा विचार सुद्धा केला जात नाही. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळे या जगात पार रममाण होऊन गेले आहेत. इतकेच काय गमतीत सांगायचे झाले तर कोणाच्या घरी गेले तरी, ' अहो जरा वाय फायचा पासवर्ड मिळेल का हो ' हे विचारायला पण मागे पुढे पाहत नाहीत. 

काही जण तर जणू कोणी भेटायला आले तर ट्रे मध्ये पाण्याच्या ग्लासच्या ऐवजी वायफाय चाच पासवर्ड देत असावेत. हाहा. जोक्स अपार्ट हे असले व्हायला फार काही वेळ लागणार नाही, असे वाटते. 

म्हणजे मोठ्या उत्साहात एखादे स्नेहसंमेलन आयोजित करतात. बरं का. 'खुप दिवस झाले बाई आपण त्या अमक्या अमक्या लोकांना घरी बोलावलेच नाही ना. या शनिवारी बोलवायचे का हो? मागे त्यांनी आपल्याला बोलावले होते ना. आपण पण उरकून टाकू. म्हणजे उगाच बोलायला नको कोणी, आपण बोलावलं नाही म्हणून. आणि हो बाहेरून काही पदार्थ ऑर्डर करुयात. म्हणजे त्या स्वयंपाक घरात मी अडकुन नाही राहणार. हो ना हो. तुमचं काय मत आहे? '  तो नवरा पण फोन मधून डोकं वर काढत, काही बोलणं समजलं नसलं तरी बायको काही बोलायला नको म्हणून दुजोरा देऊन मोकळा होतो. 

जेष्ठ नागरिक तर मोबाईल नवीन हातात आला तर एक मिनिट सोडत नाहीत. जणु एका दिवसात त्यांना शिकायचा आहे, तो कसा वापरतात ते. मग काय ते देखील तासंतास त्या मोबाईल वर वेळ घालवला सुरुवात करतात. नातवंडांना तेवढंच फावतं. आजी आजोबांना नवी गॅजेट्स शिकवायच्या निमित्ताने आपण पण वेळ वाया घालवत बसतात. 

त्यामुळे एकमेकांमध्ये संवाद कमी होऊ लागले आहेत, हे लक्षातच येत नाही कोणाच्या. मुलं तर एकलकोंडी बनत आहेत. हे वेळीच लक्षात आले तर ठिक. नाही तर नुकसान व्हायला फार काळ लागत नाही. 

कुठे बाहेर फिरायला गेले तरी त्या कार मध्ये काय किंवा कोणत्याही वाहतूक मार्गाने गेले तरी आजुबाजुला मागे पळणारी झाडे, डोंगर, निसर्ग, खरं म्हणजे सृष्टीसौंदर्य न बघता सगळ्यांचे लक्ष त्या मोबाईल गेम मधेच. काही सांगायला जा तर ओरडतात, ' अगं आई थांब ना जरा. तो ॲंग्री बर्ड गेम खेळतो आहे ना यार. काही राऊंड राहिले आहेत. आणि मला नाही त्या निसर्ग बघण्यात इंटरेस्ट. कसलं बोर आहे बाहेरचे दृश्य.' त्याच गेम मध्ये धाकटी बहीण किंवा भाऊ देखील मग्न होऊन जातात. 

कोणाच्या घरी गेले तरी हाच प्रकार. पण मग त्यामुळे ना ही मुले संवाद साधण्याच्या दृष्टीने कमी पडत जातात. कोणाशी काय आणि कसे बोलायचे हे त्यांना कळतच नाही. कारण विषय पण समजत नाही त्यांना. यामुळे कुठे जायची त्यांना इच्छा नसते. कोणी घरी आलेले नको असते. हे दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. शाळेतील डीबेटस् मधे काय की इतर विषयांवर चर्चा करण्यात कमी पडतात. पण मग आपल्याला एखाद्या विषयावर बोलता येत नाही, यांचा मनात कुठेतरी न्युनगंड निर्माण होतो जातो. 

म्हणून तर मग एखाद्या मार्गदर्शकाची मदत घ्यावी लागते. 

मला काय वाटतं, या अशा सगळ्या भानगडीत पडण्यापेक्षा घरात नियम केला पाहिजे, काही अगदीच गरजे पुरता मोबाईलचा वापर करावा. सगळे एकत्र आले की मग तो बाजुला ठेवून मस्त वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली पाहिजे. गंमतीत सांगायचे तर रोज गोलमेज परिषद (Round Table Conference) भरली पाहिजे घरात. आणि या परिषदेत घरातील प्रत्येकाची सहभागी असली पाहिजे, याची खात्री करा हं. शिवाय थोडं थोडं का होईना पण प्रत्येकाला बोलते केले गेले पाहिजे.

मला माहीत आहे, एकदम बदल घडवणे शक्य नाही. पण हळूहळू करत  रोजे रूटीन बनवत गेले तर अशक्य असे काहीच नाही. 

काय मग भरवायची गोलमेज परिषद आपापल्या परीने आपापल्या घरी? 


सौ अर्चना शिशिर दीक्षित 

बुधवार, १० मे, २०२३

मी सौंदर्यवती (१०ऑनलाईन गेम)

 मी सौंदर्यवती 


बच्चा भी खेले, बच्चे का पुरा खानदान खेले...

आता ही एक नवीनच फॅशन. आपण सगळे आधी सुट्टी मिळाली की आजी आजोबा सगळे मिळुन सापशिडी, लुडो, पत्यांचे विविध प्रकार, असे घरात बसल्या बसल्या खेळ खेळायचो. किंवा कधी बॅडमिंटन, टिकरी, लंगडी, विटीदांडू असे अनेक खेळ खेळायचो. पण आता तेच सगळे खेळ कंप्युटर वर खेळायला सुरुवात झाली आहे. प्रत्येक खेळ घरात काय एका खुर्चीवर बसून खेळता येऊ लागले आहेत. त्यात घरातील सर्व मंडळी सहभागी होताना देखील दिसतात. अहो कंप्युटर काय पण फोनवर सुद्धा ही सोय झाल्याने घरातील प्रत्येक व्यक्तीला अगदी तोंड वर करून संवाद साधायला देखील वेळ नाही असं झालं आहे. बरं त्यामुळे एकमेकांमध्ये संवाद पण असेच सुरू असतात. 'अहो ऐका ना परवा ना आपल्याकडे माझी किट्टि आहे बरका. मला एखादा छानसा गेम सुचवा ना. मागच्या महिन्यात त्या चौधरी वहिनींनी एक खेळ घेतला होता. बाईग उभं राहून पाय दुखायला लागले आमच्या बायकांचे. त्यांच्या समोर कोणी बोललं नाही. पण... जाऊदे काय सांगायचं म्हणा. पण तुम्ही मला फोनवर खेळता येईल असा खेळ सांगा हो. आजकाल फॅशन आहे हो याचीच. रहावं लागतं बाबा फॅशनप्रमाणे.‌ नाही तर सगळे ऑर्थोडॉक्स म्हणतात.' नवरा पण लगेच ढिनच्याक खेळ सुचवून मोकळा होतो.

हं इकडे पुरुष पण काही कमी नाही. ते देखील तितकेच या ऑनलाइन खेळात सहभागी होत असतात. जरा निवांतपणा मिळाला की लगेच गेम सुरू करून मग्न होऊन जातात. चुकून जरी कोणी आवाज दिला तर, ' अबे रुक आ रहा हूं यार. इतना गेम खतम होने दे. मग येतो. काय यार तिकडे बायको, इकडे तू मला आवाज देऊन देऊन बेजार करता राव. एक गेम पूर्ण करू देत नाहीत.' 

इतकेच काय तर लहान लहान मुले सुद्धा यांचे शिकार झाले आहेत. त्यांच्यासाठी एक्स बॉक्स सारखे वेगवेगळे खेळाचे गॅजेट्स घरात येऊ लागले आहेत. काही आई वर्गाला या खेळाविषयी माहिती नसते. त्यामुळे या काय आऊट डेटेड आहेत, असे म्हटले जाते. त्या देखील बिचाऱ्या अज्ञानी समजून बुजतात. तर काही आई वर्ग म्हणजे 'ए जा रे बाबा हा घे मोबाईल. मी हा गेम डाऊनलोड केला आहे. जा बस तिकडे खेळत. आणि माझ्या डोक्याशी भुणभुण करू नकोस'. असं म्हणत मुलांना गप्प करतात. 

काही आजी आजोबा देखील नातवंडांच्या हट्टाला दुजोरा देत असतात. इतरांना देखील मोठ्या फुशारकीने सांगत असतात. ' अहो आमचा नातु कौशल ना काय पटापट ऑनलाईन गेम्स खेळत असतो. त्याला सगळं माहीत आहे कसं डाउनलोड करायचं वगैरे. आजकाल आम्ही पण त्यांच्याकडे धडे घेतो. आणि खेळतो बरं का. म्हातारपणी तेवढाच आपला विरंगुळा हो. ' असं म्हणत हसत राहतात. 

पण काही घरांमध्ये या बाबतीत वाद असतात. आईचे म्हणणे असते, ' नको या नादाला लागू बाळा. हे एक प्रकारचे व्यसन आहे. याच्या आहारी जाणे योग्य नाही. थोडा वेळ खेळणे गोष्ट वेगळी आहे. पण तासंतास नाही रे घालवू. आयुष्याचे नुकसान होईल. त्यापेक्षा आपण ते तुझ्या आवडीचे पुस्तक आणले आहे, ते वाच ना राजा.'  अशा वेळी बाबांनी आईला साथ दिली तर पाल्य तिथेच सुधारू शकतो. पण वडील जर मागुन गेम खेळण्यासाठी परवानगी देत असतील तर आई हतबल होऊन जाते. आईच्या समजावून सांगण्याला, रागवण्याला काही अर्थच राहत नाही. घरात अजून क्लेश वाढण्यापेक्षा, अजून वाद निर्माण होऊ नये म्हणून आई गप्प बसते. 

या नसत्या फॅशनच्या आहारी न जाता आपण सर्वांनी मिळून यावर वेळीच योग्य उपाय करणे खूप गरजेचे आहे. मुलांचा वाचनाकडे, मैदानी खेळांकडे कल वाढवला पाहिजे. थोडा वेळ त्यांच्याबरोबर आभ्यासाविषयी चर्चा केली पाहिजे. आणि इतरांना सल्ले देण्यापेक्षा स्वतःच्या घरातून ही सुरुवात झाली खरा अर्थ आहे.